इंदु मिलचा निधी वाडिया रुग्णालयाला द्या
पुणे : 'इंदु मिलच्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणे, हे अपेक्षित नाही. त्यामुळे पुतळा व सुशोभिकरणासाठी शासनाने दिलेला सर्व निधी मुंबईतील वाडिया रुग्णालयाला द्यावा,' अशी मागणी करत वंचित बहजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी डॉ. आंबेडकरांचा पुतळा उभारण्यालाच विरोध दर्शविला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ॲड. आंबेडकर बोलत होते. इंदु मिलच्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची साडेतीनशे फुटांपर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने मुंबईतील वाडिया रुग्णालयासंदर्भात झालेल्या सुनावणीदरम्यान शासनाला खडे बोल सुनावले.पुतळ्याची उंची वाढविण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे आहेत, मात्र आरोग्यसेवेसाठी नाहीत. पुतळे महत्वाचे आहेत की रुग्णालये, असा सवाल । न्यायालयाने उपस्थित केला होता. न्यायालयाची ही भुमिका योग्य असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.