खोपोली जवळ भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
रायगड :-मुंबई - पुणे महामार्गावर बोरघाटात खोपोलीजवळच्या दस्तुरी इथे झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले तर एक जण सुदैवाने बचावला. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अमोल बालाजी चिलमे (२९), निवृत्ती उर्फ अर्जुन राम गुंडाळे (३१), गोविंद नलवाड, (३५), प्रदीप प्रकाश चोले (३१), नारायण राम गुडांळे (२७) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत.तर बालाजी हरिश्चंद्र भंडारी असे या अपघातातून वाचलेल्या व्यक्तीचं नाव असून तो किरकोळ जखमी झाला आहे.
हे सर्वजण मुळचे लातूर जिल्हयातील आहेत. हे सहाजण आपल्या तीन मोटारसायकलवरून अलिबाग इथे आले होते. अलिबागहून पुण्यातील तळेगाव इथे परतत असताना बोरघाटात मोटारसायकली उभ्या करून लघुशंकेसाठी थांबले असता लोणावळयाहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या आयशर टेम्पोचं गाडीवरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो यांच्या अंगावरच पलटी झाला. टेम्पोतील भरलेल्या गोणींखाली चिरडून पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती अपघातग्रस्त टेम्पोचालक फरार आहे.